मुंबई/प्रतिनिधीः दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात संशयित आरोपी असलेले सिल्वासा य...
मुंबई/प्रतिनिधीः दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात संशयित आरोपी असलेले सिल्वासा येथील जिल्हाधिकारी संदीपकुमार सिंग यांना आठ एप्रिलपर्यंत अटकेसारख्या कोणत्याही कठोर कारवाईपासून दिलासा मिळाला आहे.
पुढील सुनावणीपर्यंत सिंग यांच्याविरोधात कठोर कारवाई करू नये, असे तोंडी निर्देश न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने दिले. डेलकर यांनी मागील महिन्यात मरिन ड्राइव्ह येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. आपली अनेकांनी छळवणूक केल्याची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली होती. त्यात सिंग यांचेही नाव आहे. डेलकर यांचा मुलगा अभिनवने लेखी तक्रार दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवल्याने सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.’सिंग यांच्या याचिकेला उत्तर देण्यासाठी अवधी द्यावा’, अशी विनंती सुनावणीत अभिनवच्या वकिलांनी केली. याप्रकरणी राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे एसआयटीमार्फत तपास सुरू असल्याची माहिती मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी दिली. तेव्हा, याचिकादार हे जिल्हाधिकारी व सरकारी सेवक आहेत, याचा विचार करावा आणि याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे तोंडी निर्देश खंडपीठाने दिले. त्यामुळे आठ एप्रिलपर्यंत सिंग यांना दिलासा मिळाला आहे.