पुणे/प्रतिनिधीः मावळ तालुक्यातील कामशेत पोलिस ठाणे सध्या नवनवीन प्रकरणामुळे दररोज चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पो...
पुणे/प्रतिनिधीः मावळ तालुक्यातील कामशेत पोलिस ठाणे सध्या नवनवीन प्रकरणामुळे दररोज चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच एका पोलिस कर्मचार्याला एक लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणार्या पोलिस अधिकार्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बदली बाबतचे आदेश काढले आहेत; मात्र या प्रकरणातील पीडित महिलेबाबत गोपनीयता बाळगली नाही. तसे न करता, ती महिला मावळ तालुक्यातील कोणत्या पदावर काम करत आहे, याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. महिलांविषयी जागरुक असणार्या पोलिसांकडूनच संबंधीत महिलेची अबू्र वेशीवर टांगण्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांकडून झालेल्या बदनामीमुळे त्या महिलेची समाजातील प्रतिमा तसेच तिचा संसार, गावातील प्रतिष्ठा लोकांचा त्या महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन यावर मोठा परिणाम होणार आहे. ती नुसती एक महिला नाहीतर, जबाबदार सरकारी व्यक्ती आहे. तिचा बदली ऑर्डरमध्ये उल्लेख करणे म्हणजे बदनामी म्हणावे लागेल. पीडितेच्या नावाचा कुठेही उल्लेख होवू नये, असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे; पण असे असतानादेखील गोपनीयता बाळगली गेली नाही. कामशेत पोलिस ठाण्याचे पोलिस अमलदार रामचंद्र कानगुडे यांचे गावातील एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाबाबत प्रभारी पोलिस निरीक्षक यांनी तक्रार अर्जाद्वारे मागील दोन दिवसापूर्वी ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार, या प्रकरणाची दखल घेत जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाने संबंधित पोलिस कर्मचार्याविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जावर कारवाई करत पोलिस कर्मचारी कानगुडे यांची कामशेत पोलिस ठाणे येथून ओतूर पोलिस ठाण्यात प्रशासकीय कारणास्तव बदली केली आहे. पीडित महिलेबाबत असलेले अनैतिक संबंध ही बाब पोलिस दलाची प्रतिमा समाजामध्ये मलिन करणारी असल्याने वरिष्ठांकडून गांभीर्याने दखल घेत संबंधित पोलिस कर्मचार्यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याचे बदली आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.