सातारा / प्रतिनिधी : वीजबिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी मोहीम जोरदार सुरू केली आहे. राज्याचे अर्...
सातारा / प्रतिनिधी : वीजबिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी मोहीम जोरदार सुरू केली आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच सातारा जिल्ह्यात थकीत ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची कार्यवाही महावितरणकडून सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, ही कारवाई करताना पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने महावितरणच्या कर्मचार्यांवर हल्ले होवू लागले आहेत. नुकतेच सातारा शहराच्या करंजे या उपनगरातील बाबर कॉलनीत महावितरणच्या दोन कर्मचार्यांना मारहाण करण्यात आली.
विज कनेक्शन तोडण्याच्या कारणावरून काही दिवसांपुर्वी पुसेगाव येथे शिवसैनिकांनी वसूली अधिकार्यांची गाडी फोडली होती. आज (बुधवार) सातारा शहरानजीकच्या करंजे येथे दोन कर्मचार्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक तपशील समजू शकला नाही. परंतू संबंधित कर्मचारी हे बाबर कॉलनी येथे थकीत रक्कमेच्या वसूलीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
दरम्यान महावितरणने ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी किमान दोन दिवसांची मुदत द्यावी. सध्याची ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती पाहता राज्य सरकारने दुष्काळी भागातील वीज तोडणीबाबत वेगळा निकष लावून दुष्काळी भागातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी नुकतीच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांनी केली आहे.
कोरोनामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्वच नागरिक त्रस्त आहेत. अशा स्थितीत वीज जोडणी अत्यावश्यक आहे. पण वीजबिलांच्या थकबाकीमुळे कनेक्शन तोडण्याची कारवाई वीज कंपनीकडून होत आहे. वीज कंपनीने आजपर्यंत चांगले काम केलेले असताना आता कनेक्शन तोडण्याचा प्रकार निश्तिच अपमानजनक आहे. त्यामुळे थकबाकीबाबत टप्प्या-टप्प्याने रक्कम भरण्याचा निर्णय घेऊन कंपनीने महामारीने त्रस्त जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी वीज वितरण कंपनीला दिला आहे.