मुंबई/प्रतिनिधी: अँटालिया स्फोट प्रकरणापाठोपाठ आता मनसुख हिरेन प्रकरणही एनआयएकडे सोपवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश दिले अस...
मुंबई/प्रतिनिधी: अँटालिया स्फोट प्रकरणापाठोपाठ आता मनसुख हिरेन प्रकरणही एनआयएकडे सोपवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश दिले असल्याची माहिती एनआयएच्या अधिकारी जया रॉय यांनी दिली. हिरेन प्रकरणही एनआयएकडे गेल्याने सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची डोकेदुखी वाढली आहे. हे प्रकरण एनआयएकडे जाणे ही आघाडी सरकारची नामुष्की आहे.
एनआयएकडून आतापर्यंत अँटालिया प्रकरणाची चौकशी केली जात होती, तर हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एटीएसकडून केला जात होता; परंतु ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी समांतर असल्याने हे प्रकरण एनआयएकडे देण्याची मागणी होत होती. त्यामुळे अखेर हे प्रकरण एनआयएकडे गेले आहे. संशयास्पद मृत्यूशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची चौकशी एनआयए करणार असल्याने वाझे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा एनआयए त्या दिशेने तपास करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडे गेल्यानंतर या प्रकरणी एटीएसने अद्यापही वाझे यांची चौकशी केली नाही. दुसरीकडे एनआयएकडे अँटालिया प्रकरण जाताच त्यांनी वाझे यांना चौकशीसाठी बोलावले आणि त्यांना अटकही केली. एटीएसच्या या संथगती कारभारामुळेच एनआयएकडे हे प्रकरणही सोपवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विरोधकांनी सुरुवातीपासूनच दोन्ही प्रकरणे एनआयएकडे देण्याची मागणी केली होती; मात्र राज्य सरकारने एटीएसची घोषणा करून हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते; मात्र वाझे यांच्या अटकेनंतर वेगाने घडलेल्या घटनाक्रमामुळे अखेर हे प्रकरण एनआयएकडे गेले आहे. ही राज्य सरकारची नामुष्की आहे. हिरेन प्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे गेल्याने वाझे यांचा गॉडफादर कोण हे शोधले जाण्याची शक्यता आहे. वाझे यांना कोण ऑपरेट करत होते? वाझे कोणत्या राजकारण्यांच्या इशार्यावरून काम करत होते? वाझे यांना नियमानुसार पोलिस दलात घेतले का? आदी सर्व गोष्टींचा एनआयएकडून तपास केला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह पाच मार्चला सापडला. हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांनी आत्महत्या केली, की त्यांचा घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गती येत असताना तपास काढला
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गेल्या दोन-तीन दिवसांपासून दोन वरिष्ठ अधिकार्यांची चौकशी सुरू होती. हिरेन यांचे शवविच्छेदन करणार्या डॉक्टरांची टीम आणि इतर अधिकार्यांची चौकशी करण्यात आली होती. दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी ठाणे एटीएस कार्यालयात जाऊन तपास अधिकार्यांशी चर्चा केली होती