मुंबई/प्रतिनिधी : धनंजय मुंडे यांची लिव्ह इन पार्टनर असल्याचा दावा करणार्या करुणा शर्मा आता सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे. मला आमद...
मुंबई/प्रतिनिधी : धनंजय मुंडे यांची लिव्ह इन पार्टनर असल्याचा दावा करणार्या करुणा शर्मा आता सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन करुणा यांनी आज महापालिकेत महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली.
मला आधी चांगली समाजसेवा करायची आहे. 25 वर्षे मी घरात होते. आता दोन-तीन महिने झाले घराबाहेर पडले आहे. राजकारण अजून खूप लांब आहे; पण करावे लागले तर नक्की करेन. मला लोकांच्या मनापर्यंत पोहोचायचे आहे. स्वच्छतागृह आणि कचराप्रश्न घेऊन आज महापालिकेत आले होते. मी समाजसेवक आहे. राजकारणातही येईल, असे त्या म्हणाल्या. करुणा शर्मा यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे. सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉमसारख्या अॅप्लिकेशनविरोधात फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ असतात, त्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या, की आम्ही आता निवेदन दिले आहे. सध्या इंटरनेटवर खूप वाईट व्हिडीओ वायरल होत आहेत. काही साईट या अश्लीलता पसरवतात. फेसबुकवरसुद्धा काही व्हिडीओ पॉप अप होतात. ते बंद करा अशी मागणी केली आहे.
मी 25 वर्षे कधीच घराबाहेर पडले नाही. गेल्या दोन महिन्यांपासून मी घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे, असे सांगून करुणा म्हणाल्या, की माझ्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या घडामोडींविषयी केस सुरू असल्याने बोलण्यास न्यायालयानेे मनाई केली आहे; मात्र जेव्हा वेळ येईल, तेव्हा मी सगळ्या गोष्टी पुराव्यासह बोलेन. पूजा चव्हाण असो किंवा इतर कोणतीही मुलगी; तिला न्याय मिळाला पाहिजे. माझ्यासोबत जे काही झाले, त्यानंतर मी सुद्धा आत्महत्या करणार होते; पण मरण्यापेक्षा मी लढणे पसंत केले. माझ्या मुद्यावर पण मी लवकरच बोलणार आहे. त्याचा निकाल लागला की मी बोलणार आहे. शंभर टक्के सगळ्या गोष्टी सांगेन आणि पूर्ण पुराव्यासह सांगेन. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या. इथून पुढे महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही बाबी मीडियासमोर येत नाहीत, अशा महिलांची परिस्थिती खूप वाईट आहे. मी स्वतः पण आत्महत्या करणार होते. पण मग मी विचार केला की असेच मरण्यापेक्षा लोकांसाठी काही तरी करून मरु. मी लोकांना पण न्याय मिळवून देईन आणि स्वतःसाठी पण न्याय मिळवण्यासाठी मी लढणार आहे, असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.