जळगाव/प्रतिनिधीः माजी मंत्री गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे. राज्यात कुठे सरकारवर काय संकट आले, तर त्यांची संकटमोचकव म्ह...
जळगाव/प्रतिनिधीः माजी मंत्री गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे. राज्यात कुठे सरकारवर काय संकट आले, तर त्यांची संकटमोचकव म्हणून नेमणूक व्हायची. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणातून दोनदा तोडगा काढण्यातही त्यांची शिष्टाई यशस्वी ठरलेली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांना भाजपत आणण्यात महाजन यांचा मोठा वाटा. असे असताना आता त्यांच्याच जिल्ह्यात त्यांच्यावरच संकटात येण्याची वेळ आली आहे. त्यांच्या हातून जळगावची महानगरपालिका जाण्याची चिन्हे आहेत. त्याला कारण त्यांचेच राजकारण कारणीभूत ठरले आहे.
एकनाथ खडसे हे भाजपतील मुरब्बी आणि ज्येष्ठ नेते होते. ते स्पर्धेत आल्यामुळे फडणवीस यांनी त्यांना दूर सारले. महाजन यांना सारी ताकद दिली. सत्तेच्या पाच वर्षांच्या काळात उत्तर महाराष्ट्रात महाजनांचाच शब्द अंतिम असायचा. खडसे आणि महाजन एकाच जिल्ह्यातील. फडणवीस यांनी महाजनांना बळ दिल्यानंतर खडसे यांचे पंख छाटण्याचे काम महाजन यांनी केले. त्यामुळे महाजन आणि खडसे यांच्यात दुरावा वाढत गेला. रोहिणी खडसे यांच्या पराभवाला भाजपतील अंतर्गत गटबाजीच कारणीभूत होती. एकनाथ खडसे यांनी तसा थेट आरोप केला होता. खडसे यांना भाजपतून बाहेर जाण्यास फडणवीस आणि महाजन हेच जबाबदार आहेत, असे खडसे समर्थकांचे म्हणणे आहे. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी भाजपला खिंडार पाडायसा सुरुवात केली. धुळे जिल्ह्यातील एका माजी आमदाराला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले. गेल्या काही दिवसांपूर्वीन भाजपतील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर खडसे यांनी आपला मोर्चा जळगाव महापालिकेकडे वळविला. जळगाव महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान नाही. तिथे भाजपच्या हाती एकहाती सत्ता होती. शिवसेना विरोधी पक्षात आहे. भाजपचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून फारसा उपयोग नव्हता. गुलाबराव पाटील यांच्यांशी बोलून खडसे यांनी भाजपचे 27 नगरसेवक थेट शिवसेनेत नेऊन घातले. पक्षविरोधी कारवाईचा बडगा जेव्हा उगारला जाईल, तेव्हा जाईल; परंतु दोन दिवसांनी जळगाव महापालिकेत शिवसेनेचा महापौर होईल आणि संकटमोचकाच्या शहरात संकटमोचकच संकटात येईल, अशी स्थिती आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगावमध्ये जोरदार सर्जिकल स्ट्राईक करत शिवसेनेने अखेर सांगली पॅटर्न यशस्वी करून दाखवला आहे. सांगलीत राष्ट्रवादीने भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता ताब्यात घेतली, तशीच सत्ता आता शिवसेना ताब्यात घेत आहे. 27 नगरसेवकांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जळगाव महापालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक येत्या 18 मार्च रोजी होणार आहे; मात्र त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपला शिवसेनेने 27 नगरसेवक फोडून सुरूंग लावला आहे. महाजनांचा राजकीय पराभव करून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच दे धक्का देण्याची रणनीती शिवसेनेने आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपच्या अनेक बंडखोर नगरसेवकांनी खडसे, सुरेशदादा जैन यांची भेट घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत जळगाव जिल्ह्यात तोडफोडीच्या राजकारणात गिरीश महाजन यांनीही जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सत्ता आणली; मात्र या सत्तेला आता सुरुंग लागला आहे. दुसरीकडे, भाजपला धक्का देण्यासाठी राजकारणातील कट्टर विरोधक असलेले एकनाथ खडसे आणि सुरेश जैन एकत्र येत असल्याचे हे संकेत आहेत. या दोन शक्ती एकत्र झाल्यास आगामी जिल्हा परिषद, महापालिका आणि भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी हे मोठे आव्हान ठरण्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. मागील निवडणुकीमध्ये भाजपने महापालिका सत्ता आणली खरी; पण राज्यात भाजपने सत्ता गमावली. गेल्या वर्षभरात केंद्राचा पैसा वगळता कुठलाही निधी जळगाव महापालिकेला मिळाला नाही. अशा परिस्थितीत अनेक नगरसेवक बेचैन झाले. भाजपत राहून निधी मिळू शकत नसल्याने अनेक नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गळाला लागले. अखेर आता भाजपच्या ताब्यातून महापालिका जाताना दिसत आहे.