नवीदिल्ली : केंद्रीय रस्ते बांधणीमंत्री नितीन गडकरी कल्पक आहेत. लोकांचा त्रास अत्याधुनिक साधनांचा वापर करून कमी कसा करता येईल, यावर त्यांचा ...
नवीदिल्ली : केंद्रीय रस्ते बांधणीमंत्री नितीन गडकरी कल्पक आहेत. लोकांचा त्रास अत्याधुनिक साधनांचा वापर करून कमी कसा करता येईल, यावर त्यांचा भर असतो. टोलनाक्यावर लोकांचा जाणारा वेळ आणि कोट्यवधी रुपयांच्या इंधनाची नासाडी टाळण्यासाठी त्यांनी जीपीआरएस तंत्राचा वापर करण्याचे ठरविले आहे. गडकरी यांनी देशांत महामार्गाचे जाळे उभारायचे ठरविले आहे. त्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविला जात आहे. एकीकडे खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवायचा, दुसरीकडे लोकांनी रस्ता जेवढा वापरला, तेवढेच पैसे घ्यायचे, शिवाय टोलनाके हद्दपार करायचे, तर मग लोकांकडून पैसे कसे वसूल करायचे, हा प्रश्न सामान्यांना पडला असेल, त्याचे उत्तर गडकरी यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार आता देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना वाहनचालकांना पुन्हा-पुन्हा टोल प्लाझावर थांबावे लागणार नाही. येत्या एक वर्षात देशातील सर्व टोल प्लाझा संपुष्टात येतील. तथापि, याचा अर्थ असा नाही की टोल भरावा लागणार नाही. आता गाड्यांमध्ये जीपीएस सिस्टीम बसविण्यात येणार असून, त्या मदतीने टोल शुल्क भरता येणार आहे.
पूर्वीच्या सरकारच्या काळात शहरी भागात अनेक ठिकाणी टोलनाके निर्माण करण्यात आले होते जे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. ते हटविण्याचे काम एका वर्षात पूर्ण होईल. आता बहुतांश वाहने फास्टॅगचा वापर करून टोल भरतात. आता गाड्यांमध्ये जीपीएस सिस्टीम बसविण्यात येणार आहे, ज्याच्या मदतीने टोल शुल्क भरता येईल आणि त्यानंतर अशा टोलची गरज शहरामध्ये होणार नाही. महामार्गावरही टोल प्लाझा असणार नाही. रस्त्याच्या बांधणीला आलेला खर्च, त्यावरचे व्याज, देखभाल दुरुस्ती, त्यावरून जाणारी सरासरी वाहन संख्या विचारात घेऊन ज्यानं जितका रस्ता वापरला, तितकेच पैसे त्याच्या खात्यातून आपोआप वळती होतील.