कोलकात्ताः काँग्रेस आणि डाव्यांनी केलेला विनाश तुम्ही पाहिला. तृणमूल काँग्रेसने तुमच्या स्वप्नांचा चुराडा केला. गेल्या 70 वर्षात तुम्ही प्रत...
कोलकात्ताः काँग्रेस आणि डाव्यांनी केलेला विनाश तुम्ही पाहिला. तृणमूल काँग्रेसने तुमच्या स्वप्नांचा चुराडा केला. गेल्या 70 वर्षात तुम्ही प्रत्येकाला संधी दिली. आम्हाला पाच वर्षे द्या. आम्ही बंगालला 70 वर्षांच्या विनाशातून मुक्त करू. तुमच्यासाठी आमच्या जीवाचे बलिदान देऊ, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. बंगालसाठी जर खर्या अर्थाने एखादा पक्ष असेल तर तो भाजप आहे, असे ते म्हणाले.
मोदी यांनी भाजपच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये सभा घेतल्या. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून एक तासासाठी व्ह़ॉट्सअप डाऊन होते. प्रचारसभेदरम्यान त्यांनी त्याचा उल्लेख करत पश्चिम बंगालच्या विकासाचा मुद्दा मांडला. ममता दीदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, की बंगालमध्ये ज्या पद्धतीने लोकांचे समर्थन मिळत आहे, ते पाहता या वेळी राज्यात भाजप सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट दिसते आहे. बंगालने काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे सर्वांना संधी दिली आहे. जर तुम्ही भाजपला संधी दिली तर खरे परिवर्तन कसे असते, हे आम्ही दाखवून देऊ. बंगालने दीदींना 10 वर्षे दिली, पण त्यांनी धोका दिला, असा आरोप मोदी यांनी केला. दीदी, बंगालने तुम्हाला काम करण्यासाठी दहा वर्षे दिली; पण तुम्ही हिंसाचार आणि गैरकारभार करत लोकांची फसवणूक केलीत, अशी टीका त्यांनी केली. बंगालमध्ये विकास, लोकांचा सरकारवरील विश्वास सगळे काही गेल्या 50 वर्षांपासून डाऊन आहे, अशी टीका मोदी यांनी केली. ते म्हणाले, की दीदी म्हणतात खेळ संपला; पण सत्य हे आहे, की विकास सुरू होणार आहे. दीदींचे सरकार राष्ट्रीय शिक्षण योजनाची अंमलबजावणी करण्यास नकार देत आहे. त्यांना बंगालमधील तरुणांच्या भविष्याची चिंता नाही. आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो, की दीदींना बंगालमधील तरुणांच्या भविष्यासोबत खेळू देणार नाही.
बंगालमध्ये फक्त माफिया इंडस्ट्री
जर आपण केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी केली, तर लोक मोदी यांना आशीर्वाद देतील असे दीदींना वाटते. अरे दीदी, जर तुम्हाला मोदी यांना क्रेडिट द्यायचे नाही, तर नका देऊ; पण गरिबांचा हक्क का हिरावून घेता? येथे अनेक उद्योग मरणावस्थेत आहेत. फक्त एकच इंडस्ट्री सुरू आहे, ती म्हणजे माफिया इंडस्ट्री, अशी टीका मोदी यांनी या वेळी केली.