मुंबई/प्रतिनिधीः महानगरपालिकेने मॉल तसेच शॉपिंग सेंटरमध्ये जाण्यासाठी अॅन्टिजन टेस्ट किंवा कोरोना निगेटिव्ह अहवाल अनिवार्य असल्याचे सांगि...
मुंबई/प्रतिनिधीः महानगरपालिकेने मॉल तसेच शॉपिंग सेंटरमध्ये जाण्यासाठी अॅन्टिजन टेस्ट किंवा कोरोना निगेटिव्ह अहवाल अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. शॉपिंग मॉलशिवाय मॉलमध्ये असणार्या चित्रपटगृहांसाठीही हे नियम लागू असणार आहेत. महापालिकचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, की तज्ज्ञांशी झालेल्या बैठकीत रुग्णवाढीबाबत चर्चा झाली आणि आम्ही चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या चाचणीमुळे रुग्णांची संख्याही वाढणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाधित लोकांना ओळखणे आणि इतरांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोन विषाणूचे थैमान महाराष्ट्राने अनुभवले होते. दररोज हादरवणारे आकडे आणि मृत्यूंचे थैमान महाराष्ट्र पाहात होता. त्यानंतर हळूहळू दररोज नव्याने सापडणार्या कोरोनारुग्णांचा आकडा कमी कमी होत गेला. कोरोनावर मात केल्याच्या बातम्याही झाल्या आणि आता मात्र फेब्रुवारीपासून कोरोनारुग्णांच्या आकड्यांचा आलेख पुन्हा झराझर वर चढतो आहे. महाराष्ट्रात नवीन रुग्णसंख्येच्या सप्टेंबरच्या आकड्यालाही गुरुवारी मागे टाकले. राज्यात आणि विशेषतः मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी आलेल्या आकड्यांनी चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. राज्यात गुरुवारी चोवीस तासात 25 हजार 833 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जाणार आहेत. आता आजपासूनच हे निर्बंध लागू होण्याची शक्यता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वर्तवली आहे.
पेडणेकर म्हणाल्या, की मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या ही चिंतेत टाकणारी आहे. त्यामुळे शनिवार किंवा रविवारच्या आधीच नवीन नियम लागू करावे लागणार आहेत. बाजार, मॉल आणि पब पाठोपाठ समुद्रकिनार्यावर लोक गर्दी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, तिथेही नियम कडक करावे लागणार आहेत. लोक रात्रभर समुद्रकिनारी गर्दी करत आहेत. याच कारणांमुळे कोरोनाचा प्रसार अधिक झपाट्याने होत आहे. याशिवाय लोकांच्या हलगर्जीपणामुळेच ही परिस्थिती उद्भवत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे. कोणालाही टाळेबंदी करण्याची इच्छा नाही; मात्र टाळेबंदीची गरज पडणार, की नाही हे पूर्णपणे लोकांवर अवलंबून आहे.
शहरात गुरुवारी दिवसभरात उच्चांकी दोन हजार 877 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा सात ऑक्टोबरच्या उच्चांकी दोन हजार 848 संख्येपेक्षा जास्त आहे.