नवीदिल्ली : प्राईम पॉइंट फाऊंडेशन व प्रिसेन्स ई-मॅगझिन यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांना ...
नवीदिल्ली : प्राईम पॉइंट फाऊंडेशन व प्रिसेन्स ई-मॅगझिन यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. सुळे यांना 16 व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल संसद महारत्न आणि 17 व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिल्लीतील कॉन्स्टिट्यूट क्लब सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांचा गौरव करण्यात आला. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मला उपस्थित राहता आले नाही. केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याबद्दल मी आयोजकांची आभारी आहे, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी यानंतर दिली. आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकत मला सातत्याने आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. प्रांजळपणाने नमूद करावेसे वाटते, की आपला विश्वास हीच माझ्यासाठी खरी ऊर्जा आहे. यामुळेच जनहिताच्या मुद्यांना संसदेत मांडता आल्याचेही त्यांनी ट्विटरवरून व्हिडीओद्वारे सांगितले. डॉ. कोल्हे म्हणाले, की माझ्यासारख्या नवख्या खासदाराला पदार्पणातच सभागृहात सर्वाधिक प्रश्न उपस्थित करून जनहिताच्या मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा महान विभूतींच्या विचारांचा वारसा माझ्यासमोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक खा. शरद पवार यांचे आशीर्वाद पाठिशी आहेत. यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन लाभते.