कोलकात्ताः पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. विशेषत: भाजप आणि तृणमूल काँग्रेस...
कोलकात्ताः पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. विशेषत: भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे; मात्र आता बंगालमध्ये भाजप विरुद्ध भाजप असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बाहेरच्या लोकांना तिकीट दिल्याने भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. बंगालमधील अनेक शहरात रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू केली आहेत.
भाजपने बंगालच्या अलीपूरद्वार विधानसभा मतदारसंघात अर्थतज्ज्ञ अशोक लाहिरी यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. लाहिरी यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. एवढेच नव्हे, तर आम्ही लाहिरींना उमेदवारच मानत नाही, असे भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांना सुनावले. त्यामुळे अखेर पक्षाने लाहिरी यांचे तिकीट कापून जिल्हा महासचिव सुमन कांजीलाल यांना तिकीट दिले आहे. जगतादल आणि जलपाईगुडीमध्येही असाच काही प्रकार झाला. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर या दोन्ही मतदारसंघात तृणमूल काँग्रेसमधून आलेल्यांना तिकीट दिल्याचे कार्यकर्त्यांना समजले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी थेट तोडफोडच सुरू केली. जगतादलमध्ये भाजपने अरिंदम भट्टाचार्य यांना तिकीट दिले होते; मात्र कार्यकर्त्यांनी विरोध सुरू केला. जलपाईगुडीतही असेच झाले. इथे तर कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयातच तोडफोड केली. मालदाच्या हरिशचंद्रपूरमध्येही कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात तोडफोड केली. या ठिकाणी भाजपने मातिउर रहमान यांच्या नावाची घोषणा केली. मातिउर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला; मात्र त्यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केली. मालदाच्या ओल्डा मालदा सीटमध्ये गोपाल साहा यांच्या नावाची घोषणा केली. त्याला भाजप कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध करत जोरदार निदर्शने केली. या ठिकाणीही भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात तोडफोड केली. गोपाल साहा यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचेच नुकसान होणार आहे, असे येथील भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करत याचा निषेध नोंदवला आहे.