अहमदनगर/प्रतिनिधी-रेखा जरे हत्याकांडातील आरोपी व सकाळचा कार्यकारी संपादक पत्रकार बाळ ज. बोठे याला पोलिसांनी सोमवारी सायंकाळी शहरात काही ठिका...
अहमदनगर/प्रतिनिधी-रेखा जरे हत्याकांडातील आरोपी व सकाळचा कार्यकारी संपादक पत्रकार बाळ ज. बोठे याला पोलिसांनी सोमवारी सायंकाळी शहरात काही ठिकाणी नेले. जरे यांची हत्या झाल्यानंतर काही दिवस बोठे नगरमध्येच होता, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे तो नेमका कोठे थांबला होता, याची चौकशी त्याच्याकडे करण्यात येत आहे व त्यानुसार त्याला काही ठिकाणी पोलिस पथकाने नेल्याचे समजते. दरम्यान, बोठेची पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी (23 मार्च) संपणार असल्याने त्याला पारनेर न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोतवाली पोलिसांनी त्याला आमच्या ताब्यात मिळण्याचा अर्ज पारनेर न्यायालयात केला असल्यान त्यावरही मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा पत्रकार बाळ बोठे याला पोलिसांनी अटक केल्यावर मागील 8-10 दिवसांपासून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. सुरुवातीला दोन-तीन दिवस त्याने काहीच माहिती दिली नव्हती. मात्र, नंतर त्याने तोंड उघडले व त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून त्याला विविध ठिकाणी नेऊन खातरजमा करून घेतली जात आहे. रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 8च्या सुमारास हत्या झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला बोठे उपस्थित होता. मात्र, त्यानंतर 2 डिसेंबरपासून तो गायब झाला. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी 3 डिसेंबरला पत्रकार परिषदेत जरे यांच्या हत्येचा सूत्रधार पत्रकार बोठे असल्याचे स्पष्ट केल्यावर त्याचा शोध सुरू करण्यात आला. पण तोपर्यंत तो गायब झाला होता. त्यावेळी सुरुवातीचे 7-8 दिवस तो नगरलाच होता, असा पोलिसांना संशय आहे. तो 12 डिसेंबरला हैदराबादला गेल्याने त्याआधी तो कोठे होता, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. ही माहिती घेताना सुरुवातीचे काही दिवस तो नगरमध्येच होता, असा संशय असल्याने तो या काळात नेमका कोठे होता, याची खातरजमा पोलिसांनी सुरू केली आहे. सोमवारी सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या पथकाने बोठेला शहरात काही ठिकाणी नेल्याचे समजते. मात्र, त्याचा तपशील मिळू शकला नाही. पोलिसांच्या चौकशीत त्याने काही मुद्दे सांगितले असल्याने त्याबाबतही पोलिसांकडून अधिक माहिती मिळवली जात असल्याचे समजते.
आज न्यायालयात नेणार
बोठे याला पारनेर न्यायालयाने 23 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असल्याने त्याला मंगळवारी पुन्हा पारनेर न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. बोठेविरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात जरे यांच्या खुनाचा गुन्हा दाखल असून, सध्या तो याच गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे. याशिवाय त्याच्याविरुद्ध नगरच्या तोफखाना पोलिसात खंडणीचा तसेच कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे जरे यांच्या खून प्रकरणातून त्याला कोतवालीच्या विनयभंग प्रकरणात वर्ग करण्याच्या हालचाली पोलिसांच्या सुरू आहेत. कोतवाली पोलिसांनी पारनेर न्यायालयात अर्ज करून बोठेला ताब्यात देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.