शिराळा / प्रतिनिधी : शेताची नांगरट करता असताना ट्रॅक्टरखाली सापडून चालक राहुल नारायण पाटील (रा. पाडळेवाडी, वय 25, ता. शिराळा) या युवकाचा जा...
शिराळा / प्रतिनिधी : शेताची नांगरट करता असताना ट्रॅक्टरखाली सापडून चालक राहुल नारायण पाटील (रा. पाडळेवाडी, वय 25, ता. शिराळा) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री दीड ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत पांडुरंग यशवंत पाटील (रा. पाडळेवाडी) यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसातून समजलेली माहिती अशी, मृत राहुल नारायण पाटील हा सागर आनंदराव पाटील पाडळेवाडी यांच्या ट्रॅक्टरवर चालक होता. पाडळी येथील अर्जुन रामू पाटील यांच्या शेतात ट्रॅक्टर मालक सागर यांच्या सोबत राहुल, आकाश अर्जुन पाटील हे ट्रॅक्टर घेऊन गेले. त्यावेळी सागर व आकाश याने शेत नांगरणीची माहिती राहुल यास दिली. त्यानुसार राहुल शेत नांगरू लागला. साडेतीन एकर क्षेत्र नांगरट करावयाचे असल्याने वेळ लागणार होता. रात्री दीडपर्यंत सागर व आकाश त्या ठिकाणी होते. दरम्यान, नदीवरील विद्युत पंप सुरू करण्यासाठी सागर व आकाश गेले. त्यांनी पिकाला पाणी लावले. त्यामुळे राहुल एकटाच नांगरट करत होता. पहाटे पाच वाजता सागर नांगरटणीच्या ठिकाणी आला असता गुंगाराम लक्ष्मण पाटील व अर्जुन रामू पाटील यांच्या शेताच्या बांधावर ट्रॅक्टरचा नांगर पाठीमागे तुटून पडला होता तर राहुल हा ट्रॅक्टरवरून खाली पडून
कानातून आणि नाकातून अति रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच मयत झाल्याचे आढळले. राहुल याचा पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कुमार वायदंडे करत आहेत.