विविध मागण्यांचा भडीमार; ना. गडकरी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद कराड / प्रतिनिधी : पारगाव-खंडाळा येथे नवीन पूल बांधावा, कराडच्या कोल्हाप...
विविध मागण्यांचा भडीमार; ना. गडकरी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद
कराड / प्रतिनिधी : पारगाव-खंडाळा येथे नवीन पूल बांधावा, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील पुलाचे सहापदारीकरण करण्यात यावे, महामार्गावरील असलेल्या पुलावर व पुलाखाली होणारे अपघात टाळण्यासाठी विद्युतीकरण करावे, खंबाटकी घाट बायपाससाठी सुरू असलेल्या दोन नवीन बोगद्यांच्या कामाला गती द्यावी. यासह पुणे ते शेंद्रे महामार्गाचे अपूर्ण कामे लवकर पूर्ण करून त्यात सुधारणा करण्यात यावी. अशा महामार्गाच्या संदर्भातील विविध मागण्यांचा खा. श्रीनिवास पाटील यांनी गुरूवारी लोकसभेत भडीमार केला. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान अपघातमुक्त रस्ते करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू या, असे आवाहन गडकरी यांनी केले.
सातारा जिल्ह्यातून जाणार्या महामार्गाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात खा. श्रीनिवास पाटील यांनी गुरूवारी प्रश्न-उत्तराच्या तासादरम्यान पुन्हा संसदेत आवाज उठवला. ते म्हणाले, माझ्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पारगाव या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी नवीन पूल बांधाण्यात यावा. महामार्गावरील पुलावर व पुलाखाली रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना अपघाताच्या घटना घडत आहेत. असे होणारे अपघात टाळण्यासाठी महामार्गावरील आवश्यक त्या ठिकाणी विद्युतीकरण करण्याच्या उपाययोजना राबवाव्यात. तसेच कराड येथील कोल्हापूर नाक्यावर तीन पदरी पुल असल्याने त्याठिकाणी अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे प्राधान्याने येथील पुलाचे सहापदारीकरण करण्यात यावे. याशिवाय पुणे ते शेंद्रेपर्यंतच्या महामार्गाची अवस्था बिकट आहे. या ठिकाणीची कामे अपूर्ण अवस्थेत असून दर्जाहीन झाली आहेत. त्याची सुधारणा करण्यात यावी. खंबाटकी घाट बायपाससाठी दोन बोगदे तयार होत आहेत. मात्र, हे काम संथगतीने सुरू असल्याने या बोगद्यांच्या कामाला गती देण्यात यावी, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या.
प्रारंभी खा. श्रीनिवास पाटील यांनी ना. नितिन गडकरी यांच्या सोबतच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. खा. पाटील हे नागपूर येथे महानगरपालिकेचे आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष असताना ना. गडकरी हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नागपूरचे पालकमंत्री होते. त्यावेळी एकत्रीत काम करत असताना राज्याच्या शहरी भागातील पहिले सिमेंट काँक्रिटचे रस्ते साकारण्याचे काम दोघांनी मिळून नागपूर येथे केल्याचे त्यांनी नमूद केले. याची आठवण करून देताच त्यास ना. गडकरी यांनी देखील हसून प्रतिसाद दिला.
खा. पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि विविध मागण्या संदर्भात ना. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, सातारा जिल्ह्यातील महामार्गाची अपूर्ण कामे येत्या दोन-तीन महिन्यात पूर्ण होऊन जातील. मी लवकरच तिकडे येणार आहे. खासदार म्हणून आता आपल्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी बैठक घेऊन जिथे-जिथे अपघातांची ठिकाणे आहेत ते मला कळवावेत. त्यावर त्वरीत निर्णय घेतला जाईल. तसेच असे अपघातमुक्त रस्ते करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू या, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.