गोंदवले / वार्ताहर : 22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने माण तालुक्यातील सद्यस्थितीतील पाण्याचा आढावा माण तालुक...
गोंदवले / वार्ताहर : 22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने माण तालुक्यातील सद्यस्थितीतील पाण्याचा आढावा माण तालुक्यात प्रत्येक वर्षी नोव्हेंबरपासूनच टँकरची मागणी होत असे. परंतू गेल्या पाच वर्षात झालेल्या जलसंधारण कामामुळे व सलग दोन वर्षे चांगला पाऊस झाल्याने यावर्षी मार्चमध्ये ही पाणी पातळी टिकून आहे. तालुक्यातील सर्व धरणात व बंधार्यात पाणीसाठा आजही शिल्लक आहे. हीच किमया गेल्या पाच वर्षात झालेल्या जलसंधारण कामांची आहे.
खरिपाच्या तालुका म्हणून ओळखला जाणार्या माणमध्ये रब्बी हंगाम ही हळू-हळू यशस्वी होऊ लागला आहे. गावोगावी झालेले हजारो बंधार्यात पाणी साठा झाल्याने यंदा रब्बी पिके जोमात असून रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. नकदी कांदा, ऊस व भाजीपाला ही जोरात होऊ लागला आहे.
माण तालुक्यातील जनतेने वर्षानुवर्षे दुष्काळ पचवला आहे. दुष्काळी तालुका हा कलंक पिढ्यान पिढ्या पुसला जात नव्हता. त्यामुळे माणदेशी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही जगण्यासाठी बाहेर पडत राहिला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कोठेही गेले तरी माणदेशी माणसं आहेत. ज्यांना काहीच जमत नव्हते ते ऊस तोड कामगार झाले. आज तालुक्यातील काही गावातील लोक दसरा झाला ऊस तोडणीसाठी जातात. यांची दिवाळी साखर कारखान्यातील पालात होते. मुलांची शिक्षणे यांचे काही प्रमाणात यांना देणे घेणे ही नसे. कारण यांच्या पुढे जगायचे कसे हा प्रश्न असे.
सन 2015 मध्ये शासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. चार वर्षाच्या कालावधीत माण तालुक्यात सर्वच गावात मोठ्या प्रमाणात कामे झाली. माण तालुक्यात सुमारे 95 कोटी रुपयांची कामे झाली. या माध्यमातून गावोगावी सिमेंट नाला बंधारे, माती बांध, शेततळी, सलग समतल चर, पाझर तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण, यासारखी हजारो कामे झाली. त्याच बरोबर सिने कलाकार अमीर खान यांना बरोबर घेऊन सरकारने जनतेलाच मैदानात उतरवले. पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून माणच्या जनतेने गावोगावी पाणी अडवण्यासाठी श्रमदान केले. विविध कामे केली. त्याचा ही मोठा फायदा तालुक्याला झाला आहे.
जलयुक्त शिवरांच्या कामामुळे व पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे सर्वच गावात पाणी अडवले गेले. गेल्या दोन वर्षात तालुक्यात सरासरी पेक्षा दीडपट पाऊस जास्त झाल्याने केलेल्या कामाचे चीज झाले. सर्वत्र पाणी साठले गेले. विहिरींची पाण्याची पातळी वाढली. मार्च संपत आला तरी शेतकर्यांच्या विहिरीत अजूनही पाणी आहे. ही सर्व किमया तालुक्यात झालेल्या कामामुळे झाली. रब्बी हंगामातील पिकांना या कामांचा मोठा फायदा झाला. कांदा, ऊस, भाजीपाला यासारख्या नकदी पिकांचे क्षेत्र वाढले. तालुक्यात गेल्या दोन वर्षात पडीक क्षेत्र दुरुस्त करून घेण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला. खरीप व रब्बी दोन्ही हंगामातील पेरणीचे क्षेत्र वाढले.
माणमध्ये भगवा डाळिंब बागा गावोगावी वाढू लागल्या होत्या. परंतू दुष्काळ पडल्यामुळे बागा सोडून दिल्या होत्या. परंतू आता मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने शेतकर्यांनी बागा पुन्हा धरल्या. काही ठिकाणी द्राक्ष बागा दिसून येत आहेत. उसाचे क्षेत्र ही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे.भाजी पाला ही मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.गुरांसाठी मका क्षेत्रात ही वाढ झाली आहे. एकूणच सर्वच पिकांची कडधान्याची ही वाढ होऊ लागली आहे. रब्बी हंगाम संपत आला असून अजूनही शेतकर्यांच्या विहिरींना व कुप नालिकांना पाणी टिकून आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात पाणी होते. त्यामुळे उन्हाळी भुईमूग, कांदा व भाजी पाला शेतकर्यांनी घेतला होता. एवढा मोठा बदल माण तालुक्यात दिसून आला. यावर्षीही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी भुईमूग, भाजीपाला व गुरांसाठी मका आदी पिके घेण्याचे तयारीत आहेत.
ही सर्व किमया जलयुक्त शिवार व तालुक्यातील जनतेने गावोगावी केलेल्या पाणी अडवण्याचा कामांची आहे. जलयुक्त शिवार या योजनेत तालुक्यात सन 2015 मध्ये 24 गावात 33 कोटी रुपयांची 1417 कामे झाली. सन 2016 मध्ये 46 गावात 45 कोटी 56 लाख रुपयांची 1399 कामे झाली. सन 2017 मध्ये 36 गावात 11 कोटी 28 लाख रुपयांची 480 कामे झाली. तालुक्यातील सर्वच 105 गावात जलयुक्त शिवार योजनेची कामे झाल्याने रानोमाळ पाणी खळखळत आहे. याला गावोगावी जनतेने पाणी फाऊंडेशन मार्फत केलेली कामे ही कारणीभूत ठरत आहेत. जनतेने दोन हातानी केलेली कामे यामुळेही पाणी साठा वाढलेला दिसत आहे. स्वतः केलेल्या कामाचा फायदा आता शेतकर्यांना विहिरीत मार्च-एप्रिलमध्येही दिसत आहे. हा आनंद खूपच मोठा असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. तालुक्यातील सर्व पाझर तलाव, धरणे यामध्ये ही चांगला पाणी साठा शिल्लक आहे.
माण तालुक्यात टँकरची मागणी नाही
पावसाळ्यात माण तालुक्यातील यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यातच तालुक्यात झालेल्या जलसंधारनांच्या कामामुळे खूप मोठा फायदा झाला असून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. गावोगावी पाणी अडवण्यासाठी श्रमदान केले होते. ते ही आज फायद्याचे ठरत आहे. पाणी पातळी वाढली असल्याने आजपर्यंत तालुक्यातून एकाही टँकरची मागणी झाली नाही. दरवर्षी टँकरवर जगणारी अनेक गावे आता त्यांनी पाणी अडवल्याने सक्षम होऊ लागली आहेत. ही तालुक्याच्या दृष्टीने खूप मोठी व आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे शासनाचा टँकर वर होणारा कोट्यावधी रुपयांचा खर्च गेल्या दोन वर्षात वाचला आहे.
जलसंधारण कामामुळे खूप मोठा बदल
माण तालुक्यातील जलसंधारण कामामुळे तालुक्याला खूप मोठा फायदा झाला आहे. कृषी विभागाने हजारो कामे गावोगावी केली. दोन वर्षे चांगला पाऊस पडतो आहे.त्यामुळे मोठा पाणी साठा झाला. पाणी जमिनीत मुरले. पाणी पातळी वाढली आहे. जनतेने हे साठलेले पाणी जपून वापरावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पवार यांनी केले आहे.