मुंबई/प्रतिनिधीः प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडणे आणि या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या...
मुंबई/प्रतिनिधीः प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडणे आणि या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या कथित खुनामागे सचिन वाझे यांचा हात असणे आणि त्यांनी थेट पोलिस आयुक्तांना अहवाल सादर करणे यावरून आता मुंबई पोलिस आयुक्ताची खुर्ची गमावल्यानंतरही परमबीरसिंग यांच्या अडचणी कमी होणार नाहीत. सूत्रांनुसार, अँटिलिया प्रकरणाची चौकशी करणारी एनआयएची टीम लवकरच त्यांची चौकशी करू शकते. त्यासाठी गृहमंत्रालयाकडून मान्यताही मागवण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक ते पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिका-यांवर ही वेळ का येते, याचा शोध घेतला पाहिजे.
पूर्वी जिल्हाधिकार्यांइतकेच महत्त्व जिल्हा पोलिस अधीक्षकांना होते. पोलिस अधिकारी निर्भयपणे काम करीत; परंतु राज्यकर्त्यांना पोलिस यंत्रणाही कायम आपली बटीक असली पाहिजे, असे वाटते. पोलिसांना सलाम घेण्यात राज्यकर्ते धन्यता मानतात. पोलिसांचे पगार इतर विभागापेक्षा कायम कमी ठेवले आहेत. त्या तुलनेत त्यांना कामे भरपूर दिली जातात. शिवाय बदल्यांसह अन्य बाबतीत मोठी रक्कम मोजावी लागते. त्यामुळे पगारात भागवा अभियानाला पोलिसांचा तसा फारसा प्रतिसाद मिळत नाही. कायम दडपणाखाली काम करावे लागत असल्याने त्यांची बंडखोर वृत्ती उफाळून येते. गुन्ह्याचा चांगला तपास करणे पोलिसांकडून अपेक्षित असताना त्यांना ती कामे करू देण्याऐवजी त्यांच्या कामात कायम हस्तक्षेप केला जातो. त्यामुळे मग सामान्यांना न्याय देण्याची त्यांची वृत्ती कमी होते आणि पैशाचा मोह बळावत जातो. त्यातून अशी प्रकरणे वाढत जातात.
राज्यकर्त्यांना एखादे प्रकरण नीट हाताळता आले नाही, की त्याची जबाबदारीही पोलिसांवर टाकून मोकळे होण्याची वृत्ती वाढली आहे. वाझे आणि परमबीर सिंह प्रकरणात तसेच झाले आहे. जिलेटिन असलेल्या स्कॉर्पिओच्या जप्तीनंतर, सचिन वाझेंकडे चौकशी परमबीरसिंग यांनीच सोपवली होती. गुन्हे शाखेत अनेक वरिष्ठ असूनही वाझे यांना सीआययूचा प्रमुख का बनवले, राजशिष्टाचार नियम बाजूला ठेवून ते थेट पोलिस आयुक्तांना रिपोर्टिंग का करत होते, वाझे जॉइन झाल्यानंतर लगेच जवळपास सर्वच महत्त्वाची प्रकरणे त्यांच्याकडे का सोपवली?सहाय्यक पोलिस निरीक्षक असूनही, कधी वाझेंच्या प्रभावावर शंका का नव्हती? अँटिलिया प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर न्यायालयीन अधिकारी नसतानाही वाझे यांना चौकशी का सोपवली गेली? वाझे यांना विशेष पॉवर देण्यासाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीचा दबाव होता का? आदी प्रश्नांवर आता सिंह यांची चौकशी केली जाऊ शकते.
एनआयएची टीम या प्रकरणात सह पोलिस आयुक्त (क्राइम) मिलिंद भारंबे आणि उप पोलिस आयुक्त (क्राइम) प्रकाश जाधव यांचे जबाबही नोंदवेल. एनआयएला हे जाणून घ्यायचे आहे की कुणाच्या सांगण्यावरुन वाझेंना स्कॉर्पिओ प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली होती. एनआयए भारंबे आणि जाधव यांचा जबाब अत्यंत महत्त्वाचे मानते. परमबीरसिंग 2020 च्या फेब्रुवारीमध्ये मुंबई पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई पोलिस आयुक्त होण्यापूर्वी ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होते. या पोस्टवरही त्यांनी एक निर्णय दिला होता, ज्याची खूप चर्चा होती. त्यांच्या कार्यकाळातच नोव्हेंबर 2019 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट दिली होती. महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होऊन नंतर हटविले गेलेले परमवीर सिंह एकटेच नाहीत. अरुप पटनायक हे 1 मार्च 2011 ते 23 ऑगस्ट 2012 या काळात मुंबई पोलिस आयुक्तपदी कार्यरत होते. मुंबईतील आझाद मैदानावर उसळलेल्या दंगलीप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्या वेळी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरुन मोठा वाद तयार झाला. ते राजकीय षडयंत्राचा बळी ठरल्याचंही मत ज्युलियो रिबेरो आणि बी. रमन यांनी व्यक्त केले होते.
सत्यपाल सिंह 23 ऑगस्ट 2014 ते 31 जानेवारी 2014 या काळात मुंबईचे पोलिस आयुक्त होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी डार्विनचा सिद्धांत नाकारल्याने ते चांगलेच वादात सापडले होते. राकेश मारिया हे 16 फेब्रुवारी 2014 ते 8 सप्टेंबर 2015 या काळात मुंबई पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी शिना बोरा या हायप्रोफाईल हत्येप्रकरणी केलेल्या कारवाईनंतर त्यांना अचानक बढती देऊन मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन हटवण्यात आले होते. त्यांचीही बदली पोलिस महासंचालक (होमगार्ड) येथे करण्यात आली होती. अहमद जावेद हे 8 सप्टेंबर 2015 ते 31 जानेवारी 2016 या काळात मुंबईचे पोलिस आयुक्त होते. मारिया यांची शिरा बोना प्रकरणी बदली झाल्यानंतर त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांची नियुक्ती सौदी अरबचे राजदूत म्हणून करण्यात आली.
परमबीर सिंग यांनी 29 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबई पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली. ते 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या असलेली गाडी उभी केल्याप्रकरणी वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांना पाठीशी घातल्याचा त्यांच्यावर आरोप झाल्याने त्यांची बदली झाली.