अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहराला मुळा धरणातून नेमके किती पाणी येते व मनपाद्वारे शहरातील नागरिकांना किती पाणी वितरित होते, याची खानेसुमारी महा...
अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहराला मुळा धरणातून नेमके किती पाणी येते व मनपाद्वारे शहरातील नागरिकांना किती पाणी वितरित होते, याची खानेसुमारी महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी पुण्याच्या संस्थेची नियुक्ती केली गेली आहे. दरम्यान, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले व मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी नगरच्या पाणी योजनेची पाहणी नुकतीच केली.
नगर शहरात मागील काही दिवसांपासून पाणी टंचाईची स्थिती काही भागात जाणवत आहे. मुळा धरणात मुबलक पाणी असूनही शहरातील काही भागात कमी दाबाने पाणी येते. यामुळे नगरसेवकांकडून पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापालिकेकडे होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त शंकर गोरे यांनी मुळा धरणातून नगर शहराला नेमके किती पाणी येते, विळद जलशुद्धीकरण केंद्रात किती पाणी शुद्ध होते व तेथून ते नागापूर उपकेंद्रात किती येते आणि मग वसंत टेकडी येथील मुख्य टाकीत किती पाणी येते याची माहिती घेण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. वसंत टेकडी टाकीत येणार्या पाण्याचे वितरण शहरभर असलेल्या उंच टाक्यांद्वारे कसे होते, याचीही माहिती त्यांनी मागवली आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेच्या वतीने पाणीपातळी मोजण्याचे काम हाती घेतले असून पुणे येथील एजन्सीमार्फत मुळा धरणातून पाण्याचा होणारा उपसा व याचबरोबर विळद व वसंत टेकडी येथील पाण्याच्या पातळीची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
घुले-गोरेंनी दिली भेट
स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले व आयुक्त शंकर गोरे यांनी केली मुळा धरण, विळद जलशुद्धीकरण केंद्र व वसंतटेकडी मुख्य टाकीतील पाणीपातळी तपासणीची पाहणी केली. पाणीपातळीचा अहवाल आल्यानंतर लगेच उपाययोजना करणार असल्याचे सभापती घुले यांनी सांगितले. मुळा धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही शहरामध्ये नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी स्थायी घुले यांनी पाणी पुरवठा विभागाची बैठक घेऊन शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर सभापती घुले, आयुक्त गोरे, नगरसेवक गणेश भोसले, पाणी पुरवठा विभाग प्रमुख परिमल निकम, माजी नगरसेवक निखिल वारे यांनी पाहणी केली.
अहवालानंतर बैठकीत नियोजन
सभापती घुले म्हणाले की, येत्या दोन दिवसात पुणे येथील एजन्सीकडून पाणी पातळी तपासणीचा तसेच पाणी पुरवठा उपसा व वितरणातील त्रुटीचा अहवाल येणार आहे. त्यानंतर लगेच आयुक्त गोरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल, असे ते म्हणाले. दरम्यान, नगर शहराला मुळा धरणातून अमृत पाणी योजनेची दुसरी पाईपलाईन टाकण्याचे कामही अंतिम टप्यात आलेले आहे. या कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अमृत पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर नगर शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होऊन नागरिकांना मुबलक पाणी मिळेल, असा विश्वास सभापती घुले यांनी व्यक्त केला. तसेच नवीन पाईपलाईन टाकण्यास सहकार्य करणारे शेतकरी पठारे यांना नुकसान भरपाई पोटी पंचनाम्याचा चेक मनपाद्वारे वितरीत करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतींना अखंड पाणीपुरवठा?
नगर शहरातील अनेक भागात 10-10 दिवसातून पाणी मिळत आहे. ज्यांना 1 दिवसाआड पाणी मिळते, त्यांनाही केवळ अर्धा ते एक तासही पाणी मिळत असते. असे असताना महापालिकेच्या जलवाहिनीवरून देहरे, विळद व शिंगवेनाईक ग्रामपंचायतीला 24 तास पाणीपुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. तसेच मुख्य जलवाहिनीवरुन व्यावसायिक नळ जोड देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना तसेच व्यावसायिक नळजोडांना दिल्या जाणार्या पाण्याची व बिलाची तपासणी होणे आवश्यक आहे.