नवीदिल्लीः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी ज्युलिओ रिबे...
नवीदिल्लीः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी ज्युलिओ रिबेरो सारख्या एखाद्या उत्तम अधिकार्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राजीनामा घ्यायचा, की नाही याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. तेच याबाबत निर्णय घेतील असे ते म्हणाले. दरम्यान, पवार यांनी ठाकरे, तसेच पक्षातील अन्य नेत्यांशी चर्चा केली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर उद्या निर्णय अपेक्षित आहे.
सिंग यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंग यांनी केल्यानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली आहे. त्यासाठी राज्यभरात आज आंदोलन करण्यात आले. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने पवार यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली. या वेळी त्यांनी राज्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. पवार म्हणाले, की हे गंभीर प्रकरण आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आरोप झाले आहेत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची चांगल्या अधिकार्यांमार्फत चौकशी झाली पाहिजे. ज्युलिओ रिबेरो सारखे अधिकारी आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आम्ही देशमुख यांचे म्हणणे ऐकून घेऊ आणि सहकार्यांशीही चर्चा करू. राजीनामा मागणे हे विरोधकांचे कामच आहे. या वेळी पवार यांनी विरोधी पक्ष आणि परमबीर सिंग यांचे साटेलोटे असल्याचे संकेत दिले. विरोधी पक्षनेते दिल्लीत आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली. परमबीर सिंगही दिल्लीत आले. त्यांनी माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. ते अनेकांच्या संपर्कात असतील. त्यांच्याशी बोलले असतील. त्यानंतरच पत्र आले असावे, असेही पवार म्हणाले. या वेळी त्यांनी सिंग यांच्या पत्रावर काही निरीक्षणे नोंदवली आहेत. सिंग यांच्या पत्रावर सही नाही. तसेच त्यांनी गृहमंत्र्यांना शंभर कोटी रुपये दिले जात असल्याचे म्हटले आहे; परंतु हे पैसे कसे दिले गेले याचा काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही. कुणाकडे दिले याचाही उल्लेख नाही. तसेच बदली झाल्यानंतरच सिंग यांनी हे आरोप केले आहेत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. बदली होत असल्याने सिंग नाराज होते. त्यामुळे त्यांनी हा आरोप केल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारवर कुठलाही परिणाम नाही
थेट गृहमंत्र्यांवर आरोप होत असल्यामुळे सरकारवर त्याचा काही परिणाम होईल का, असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्या वेळी महाराष्ट्र सरकारवर कुठलाही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिमेवरही त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. विरोधकांकडून सरकार अस्थित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे ते म्हणाले.
गृहखाते परब चालवितात, की देशमुख?
गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, या प्रकरणाची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालवते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरे अनिल परब देतात. या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा? हे स्पष्ट झालेच पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.