राज्यातील आमदार शक्यतो दुसर्याच्या तालुक्यात राजकीय लुडबूड करीत नाहीत; परंतु आमदार राधाकृष्ण विखे आणि त्यांचा मुलगा डॉ. खासदार सुजय विखे या...
राज्यातील आमदार शक्यतो दुसर्याच्या तालुक्यात राजकीय लुडबूड करीत नाहीत; परंतु आमदार राधाकृष्ण विखे आणि त्यांचा मुलगा डॉ. खासदार सुजय विखे यांचा मात्र अन्य तालुक्यांत सारखा हस्तक्षेप होत असतो. त्यात न केलेल्या कामांचं श्रेय घ्यायला आणि न झालेल्या कामांचं खापर इतरांच्या नावावर फोडण्यात विखे यांचा हात कुणीच धरणार नाही.
राज्यात अनेक मतदारसंघ दोन-दोन, तीन-तीन तालुक्यात पसरलेले असतात. मतदारसंघातील काही गावं दुसर्या तालुक्यात असली, म्हणजे लगेच त्या गावांसाठी संबंधित तालुका पंचायत समितीची बैठक घेणं आणि तीही त्या तालुक्याच्या आमदारांना विश्वासात न घेता हे गैर आहे. पूर्वी संगमनेर तालुक्यातील अनेक गावं अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडलेली होती. तसंच नगर-नेवासे हा ही स्वतंत्र मतदारसंघ होता. असं असताना मधुकर पिचड, शिवाजीराव कर्डिले यांनी कधी दुसर्याच्या तालुक्यात जाऊन पंचायत समित्यांच्या आढावा बैठका घेतल्या नाहीत. विखे यांनी मात्र श्रीरामपूर, संगमनेर पंचायत समितीच्या आढावा बैठका घेतल्या. खरंतर अशा बैठका घ्यायच्याच असतील, तर त्या तालुक्यांच्या आमदारांनाही बैठकांना बोलविणं अपेक्षित असतं; परंतु विखे यांनी तसं कधीच केलं नाही. त्यांच्यामुळं दोन-दोनदा संबंधित तालुक्यातील पंचायत समित्यांच्या आढावा बैठका घ्याव्या लागतात. खरंतर आमदारांनी पंचायत समित्यांच्या आढावा बैठका घेण्याचंही काहीच कारण नाही. त्यांच्याकडं संबंधित गावांच्या काही समस्या येत असतील, तर ते आढावा बैठका न घेताही सोडवू शकतात; परतुं कामं किती केली, यापेक्षा केलेल्या, न केलेल्या कामाची प्रसिद्धी किती मिळाली, यावर विखे यांच्या कामाचं मोजमाप ठरत असतं. पारनेरचे आमदार तर तीन तालुक्यांतील गावांचे आमदार आहेत. नीलेश लंके सतत जनतेत असतात. त्यांनी कधीही नगर तालुक्याच्या किंवा राहुरी तालुक्याच्या पंचायत समितीची आढावा बैठक घेतलेली नाही. त्यामुळं त्यांचं काही अडलं आहे किंवा त्यांच्या मतदारसंघात येणार्या गावांची कामं काही होत नाहीत, असं घडलेलं नाही. तीच बाब नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची. त्यांनी कधीही नगर तालुका पंचायत समितीची बैठक घेतलेली नाही. आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुका पंचायत समितीत आढावा बैठक घेतली असली, तरी त्यांच्या मतदारसंघात राहाता तालुक्यातील काही गावं येतात, म्हणून त्यांनी राहात्यात जाऊन आढावा बैठक घेतली नाही. तीच बाब आ. लहू कानडे यांची. त्यांच्या मतदारसंघात राहुरी तालुक्यातील दोन महसूल मंडळं येतात, म्हणून त्यांनी राहुरी तालुक्यात जाऊन कधी तिथं आढावा बैठक घेतली नाही. विखे यांना मात्र बैठकांचा मोठा सोस. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. एखादं काम मंजूर झाल्यानंतर त्याचं प्रत्यक्षात भूमिपूजन होताना सत्तांतर झालेलं असतं. त्यामुळं नव्यानं आलेल्यानं हे काम केलं, असा त्याचा अर्थ होत नाही. फारतर पाठपुरावा केला, असं म्हणावं लागतं. नगर शहरातील उड्डाणपुलाचं श्रेय भलेही खासदार डॉ. सुजय विखे घेत असतील; परंतु हे काम दिलीप गांधी खासदार असताना त्यांनी मंजूर करून आणलं होतं आणि त्यासाठी वारंवार नितीन गडकरी यांच्याकडं पाठपुरावा केला होता. कल्याण-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महार्मागाचंही तसंच. या महामार्गाच्या डागडुजीचं काम आता सुरू झालं आहे ़आणि ते निकृष्ट होत असताना विखे केवळ इशाराच देत आहेत. भाऊसाहेब वाकचौरे खासदार असताना नगर-शिर्डी-सिन्नर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडं वर्ग झाला. या रस्त्याचं काम ज्या ठेकेदारानं केलं, त्यानं न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळं या रस्त्याचं काम रेेगाळलं होतं. खरंतर विखे यांचा रस्त्याशी काहीही संबंध नाही. संबंध आहे, तो खासदार सदाशिव लोखंडे यांचा; परंतु तिथंही विखे यांनी आपल्यामुळं या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला, असं सांगायला सुरुवात केली. वाकचौरे, डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी दीर्घ काळ या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा केला. आता या रस्त्याची डागडुजी सुरू झाली, तर श्रेय घ्यायला विखे पुुढं. नगर-टेंभुर्णी रस्त्याचंही तेच. नगर-कल्याण रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनला गडकरी जेव्हा भाळवणीला आले होते, तेव्हाच त्यांनी नगर-सोलापूर रस्त्याचं काम राष्ट्रीय महामार्गाकडं वर्ग करण्याचं जाहीर केलं होतं. बाह्यवळण रस्त्यांसाठीही त्यांनीच त्या वेळी निधी जाहीर केला होता. त्यावेळी विखे खासदारही नव्हते. गडकरी यांना सर्वपक्षीय राजकारणी कामासाठी भेटत असतात. पक्ष न पाहता ते कामाचं महत्त्व पाहून त्यांना मंजुरी देतात. आ. रोहित पवार यांनीही त्यांची भेट घेतली. त्यांच्या आश्वासनानंतर पवार यांनी काम मंजूर झाल्याचं, निविदा निघाल्याचं जाहीर केलं. त्याला तीन-चार महिने झाले. विखे यांनी त्यावर आतापर्यंत मौन पाळलं; परंतु आताच त्यांना आपल्या कामाचं श्रेय पवार घेत असल्याची जाणीव झाली. पवार यांनी जामखेड-कर्जत मतदारसंघात काय कामं केली किंवा नाही केली, हे तेथील जनतेला चांगलंच माहीत आहे. ज्यांच्या पराभवाचं खापर विखे यांच्यावर फोडलं जातं, त्या प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात भरपूर विकासाची काममं केली, असं विखे यांनी सांगितलं आणि पवार यांच्यावर काम करीत नसल्याची टीका केली, त्याच जामखेड-कर्जतमधील जनतेनं प्रा. शिंदे यांना मंत्रिपद असतानाही का नाकारलं, याचं आत्मचिंतन खासदार विखे यांनी करायला हवं. कर्जतच्या सभेतच विखे यांच्यासमोर बाळासाहेब शिंदे या भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यानं कर्जत तालुक्यात अजित पवार यांच्या कामाचा पाढाच वाचला. त्यामुळं विखे यांंची बोलतीच बंद झाली असावी.