गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यात शनिवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. बहुतांशी ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला...
गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यात शनिवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. बहुतांशी ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. एक-दोन ठिकाणी गारा पडल्या. या पावसामुळे शिवारात काढणीची लगबग सुरू असलेला बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून आभाळात झालेली ढगांची गर्दी पावसाच्या आगमनाची माहिती देत आहे. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास माण तालुक्यातील बोथे गावच्या शिवारात पावसास सुरुवात झाली. बोथे, कुळकजाई, शिरवली, शिंदी खुर्द व भांडवली परिसरात अर्धा तास जोरदार पाऊस पडला. बोथेच्या नलवडेवस्ती परिसरात गारा पडल्या तर मलवडी, बिजवडी, शिंगणापूर, दानवलेवाडी, जाधववाडी, कुक्कुडवाड, पुकळेवाडी परिसरात हलक्या सरी कोसळल्या.
शिवारात काढणीस आलेला गहू, ज्वारी अशी पिके उभी आहेत. पावसाने भिजल्यामुळे हाताला आलेल्या पिकांचे नुकसान होणार आहे. बहरात आलेल्या कांदा बियाणाचे तसेच काढलेल्या कांद्याचेही नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळ आंब्याचा मोहोर गळण्याचे तसेच आंब्यावर डाग पडण्याची शक्यता आहे.