इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा प्रांत नागेश पाटील रजेवर गेल्याने वाळवा-शिराळा तालुक्यातील मंडलाधिकारी व तलाठ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन ...
इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा प्रांत नागेश पाटील रजेवर गेल्याने वाळवा-शिराळा तालुक्यातील मंडलाधिकारी व तलाठ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. प्रांताधिकारी पाटील कामावर रुजू झाल्यास पुन्हा संपुर्ण जिल्ह्यात काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
वाळवा तालुक्यातील तीन तलाठ्यांना प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्याकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वाळवा-शिराळा तालुक्यातील मंडलाधिकारी व तलाठ्यांनी दोन दिवसापासून काम बंद आंदोलन केले होते. प्रांताधिकारी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला होता. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी नेमलेल्या दोन सदस्य समितीने गुरुवारी इस्लामपूरात येवून संबंधितांचे जबाब नोंदवले. या समितीने आपला अहवाल दिल्यानंतर जिल्हाधिकारी या प्रकरणावर आपला निर्णय देणार आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर प्रांताधिकारी नागेश पाटील हे गुरुवारपासून आठ दिवसाच्या रजेवर गेले आहेत. त्यांचा तात्पुरता पदभार मिरजेच्या प्रांताधिकार्यांना देण्यात आला आहे. प्रांताधिकारी पाटील रजेवर गेल्याने तलाठी संघटनेने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. प्रांताधिकारी नागेश पाटील पुन्हा कामावर रुजू झाल्यास पुन्हा आंदोलनावर जाणार असल्याचे तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय तोडकर यांनी सांगितले.