अहमदनगर/प्रतिनिधीः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पोलिस दलही त्यापासून मुक्त राहू शकलेले नाही. जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकारी व 20 क...
अहमदनगर/प्रतिनिधीः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पोलिस दलही त्यापासून मुक्त राहू शकलेले नाही. जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकारी व 20 कर्मचारी सध्या कोरोनाबाधित आहेत. याशिवाय जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांच्या कारागृहात असलेल्या सुमारे सव्वाशेवर कैद्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या कैद्यांना एकाच ठिकाणी वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी नगरला महासैनिक लॉनमध्ये क्वारंटाईन व उपचार केंद्र करण्याचे प्रयत्न पोलिस दलाने सुरू केले आहेत.
गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा जिल्हाभरात वाढला आहे. रुग्ण संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नेहमी जनतेशी संबंध येणार्या पोलिसांनाही कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. सध्या पाच अधिकारी व 20 कर्मचार्यांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. मुख्यालयातील तसेच शहरातील पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांचा यामध्ये समावेश आहे. पोलिसांच्या लसीकरणाचीही मोहीम यानिमित्ताने गतिमान करण्यात आली आहे.
न्यायालयीन कोठडी मिळालेले बहुतांश कच्चे कैदी जिल्हाभरातील विविध पोलिस ठाण्यांतील कारागृहात आहे. तेथे त्यांच्यासाठी पुरेशी जागा नाही. आजारी कैद्याला स्वतंत्र ठेवण्याचीही सुविधा अपुरी आहे. त्यामुळे कैद्यांमध्ये संसर्ग वाढत आहे. जिल्ह्यात सध्या सव्वाशेवर कैदी कोरोना पॉझिटीव्ह आहेत. पूर्वी या कच्च्या कैद्यांच्या सुरक्षेसाठी 60-70 कर्मचारी नियुक्त केले जायचे; पण आता कोरोना पॉझिटीव्ह कैद्यांना वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यांत दाखल करावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी आणखी शंभराहून अधिक कर्मचारी नियुक्त करावे लागले आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्यांच्या कामकाजावरही परिणाम होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा पोलिस दलाने या सर्व कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना नगरला एकाच ठिकाणी ठेवून तेथेच त्यांच्यावर वैद्यकीय उपचार व विलगीकरण सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नगरच्या महासैनिक लॉन्समध्ये यादृष्टीने आवश्यक सुविधांची तपासणी पोलिसांनी केली आहे. ही जागा निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. येथे सर्व कैदी ठेवल्यावर त्यांच्या सुरक्षेसाठी एकत्रित व कमी पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागणार आहे. त्याचेही नियोजन सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी, सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ बोठे हा पारनेरला पोलिसांच्या कारागृहात आहे व त्याच्या बराकीतील काही कैदी पॉझिटीव्ह असल्याचे समजते; मात्र बोठेची कोरोना तपासणी निगेटीव्ह आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जे कैदी पॉझिटीव्ह आले आहेत, त्यांच्या आरोग्याचा व सुरक्षेचाही विषय यानिमित्ताने आहे. त्यामुळे या सर्वांना एकाच ठिकाणी कशा पद्धतीने ठेवता येईल, याचा विचार सुरू असून लवकरच त्यासाठी आम्ही जागा निश्चित करून त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू करणार आहोत. महासैनिक लॉन्सची जागाही जवळपास निश्चित होण्याच्या मार्गावर आहे.
मनोज पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक