लोणंद / वार्ताहर : काही दिवसांपूर्वी सासवड, ता. फलटण गावच्या हद्दीत हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पाईपलाइनला छिद्र पाडून चोरीचा प्रयत्न कर...
लोणंद / वार्ताहर : काही दिवसांपूर्वी सासवड, ता. फलटण गावच्या हद्दीत हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पाईपलाइनला छिद्र पाडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. हे पेट्रोल जमिनीत मुरल्याने तसेच शेतकर्यांच्या शेतात पसरल्याने मोठे नुकसान झाल्याचा प्रकार घडला होता. ज्यांच्या पराक्रमामुळे हा प्रकार घडला त्या संबधित प्रकरणातील चोरट्यांना पकडण्यास लोणंद पोलिसांना यश आले असल्याची माहिती लोणंद येथे पत्रकार परिषदेत घेऊन पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली.
याबाबत बन्सल यांनी दिलेली माहिती अशी की, दि. 23 फेब्रुवारी 21 रोजी दुपारी 3.40 वाजताचे सुमारास मौज सासवड येथे जमीनीच्या खालून जाणारी हिंन्दुस्थान पेट्रोलियम कंपनीची पाईप लाईनला छिद्र पाडून पेट्रोलची चोरी करण्याचा संशयितांनी प्रयत्न केला होता. त्यातून सुमारे दोन हजार लिटर पेट्रोल शेजारच्या ज्वारीच्या शेतात पसरल्याने, जमीनीत मुरलेले पेट्रोल आजुबाजुचे विहीरीत उतरल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या पेट्रोलचे बाजारभाव मुल्यांनुसार 1 लाख 90 हजार रुपये असे असल्याचे हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड या कंपनीचे सहाय्यक प्रबंधक विकी सत्यवान पिसे यांनी लोणंद पोलीस ठाणेस दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धिरज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी हा गुन्हा उघडकीस आणणेबाबत लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी विशाल वायकर यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सपोनि वायकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत यातील सराईत अंतरराज्य टोळीतील (7) सात आरोपी निष्पन्न करुन त्यांना गुन्हे शाखा क्रमांक 2 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मदतीने पिंपरी-चिंचवड परिसरातून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले. तपासादरम्यान सात ही संशयित आरोपींनी हा गुन्हा केल्याची कबुली केल्याने तसेच त्यांनी अशा प्रकारचे पेट्रोल चोरी सारखे गुन्हे महाराष्ट्रातील अनेक इतर जिल्ह्यामध्ये केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सातही जणांना अटक करण्यात आली आहे.
अनित हरीशंकर पाठक (वय 32, रा. मुळ गाव पिंडराई पटखान, जि. वाराणसी, राज्य उत्तर प्रदेश, सध्या रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), बाळु आण्णा चौगुले (वय 42, रा. रामनगर चिंचवड, पुणे), मोतीराम शंकर पवार (वय 20, रा. गवळीमाथा, भोसरी पुणे), इस्माईल पिरमहंमद शेख (वय 62, रा. डीमार्ट शेजारी, पिंपरी, पुणे), शाम शिवाजी कानडी (वय 50, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), दत्तात्रय सोपान लोखंडे (वय 41, रा. सासवड, ता. फलटण, जि. सातारा), नामदेव ज्ञानदेव जाधव (वय 28, रा. दालवडी, ता. फलटण, जि. सातारा) या संशयितांना अटक करण्यात आले आहे. संशयितांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फलटण यांचे न्यायालयात हजर केले असता दि. 12 रोजीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे करत आहेत.